‘हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल, त्यादिवशी पर्यायी सरकार देऊ’ देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
‘सध्या आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत, विरोधी पक्षात आम्ही काम करणार आहोत, लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, लोकांकरता आम्ही संघर्ष करणार आहोत’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार की नाही याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. हे आज कोसळेल, उद्या कोसळेल असं भाकित मी कधीच केलं नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्यादिवशी पर्यायी सरकार देऊ’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
‘सध्या आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत, विरोधी पक्षात आम्ही काम करणार आहोत, लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, लोकांकरता आम्ही संघर्ष करणार आहोत’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?
विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, नियम बदलण्याची बैठक ही नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत होऊ शकते. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नाही, एकमेकांवर विश्वास नाहीए, आमदारांवर विश्वास नाहीए, म्हणून “हात वर करुन मतदान घेण्याचा विषय आलेला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
छगन भुजबळांनी घेतली भेट
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज माझी भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आम्हाला राजकारण करायचं नाही, त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना मदत करु, मी त्यासंदर्भातली नोटही द्यायला तयार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपण ओबीसी आरक्षणासाठी एकत्रित काम करु, भुजबळ यांनी त्याचं नेतृत्व केलं तरी हरकत नाही, कारण ते सत्तारुढ पक्षात आहेत, आमच्याकडून पूर्ण मदत केला जाईल असं आश्वासनही दिल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. फेब्रुवारीमध्ये महत्त्वाच्या निवडणुका येणार आहेत, त्याआधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘त्या’ पक्षात चाललंय काय?
नाना पटोले एक बोलतात, मग शरद पवार त्यावर एक मत व्यक्त करतात. त्यानंतर त्यांचे काही लोक शरद पवार यांना नाना पटोले यांना घेऊन न जाता भेटतात. यातून समजू शकतो काय चाललं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.