वसई रेल्वे पोलिसांवर कामाचा ताण
वसई : रेल्वे स्थानकात वाढलेली प्रवाशांची गर्दी व वाढते गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता रेल्वे पोलीस ठाण्यात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सध्या वसई रेल्वे पोलिस ठाण्यात १६९ मंजूर पदापैकी केवळ ८९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.
मीरा रोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची हद्द आहे. यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश होतो. या सर्व भागाचा कारभार हा वसई रेल्वे पोलीस ठाण्यामार्फत चालविला जातो. वसई पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. कारण वसई रेल्वे स्थानकासह नालासोपारा, विरार, भाईंदर, मीरा रोड अशा महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या स्थानकांचा ही समावेश आहे. अशा ठिकाणी कमी मनुष्यबळ असताना लक्ष ठेवणे खूपच कठीण काम आहे. या कार्यक्षेत्राच्या मानाने रेल्वे पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे.सद्य:स्थितीत वाढत्या नागरीकरणामुळे दररोज मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच रेल्वेत मोबाइल चोरी, पाकीटमारी, सोनसाखळी चोरी, हाणामारी यासह विविध प्रकारचे गुन्हे घडतात. या गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर आहे. त्यातच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा रेल्वे पोलिसांवर आहे. हे सर्व कामकाज पार पाडण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत असतात. वसई रेल्वे पोलीस ठाण्यात १६९ पदे मंजूर आहेत. त्या मंजूर पदांपैकी सध्या वसई रेल्वे पोलीस ठाण्यात केवळ ८९ इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यातही कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी १५ ते २० कर्मचारी हे कार्यालयीन कामकाज पाहतात. साप्ताहिक सुट्टी, तर कधी कर्मचारी कामानिमित्त सुट्टीवर, तर काही वेळा एखादा कर्मचारी आजारी पडतो अशा वेळी आहे त्या कर्मचारी वर्गात कामकाज चालवावे लागत आहे. अजूनही मंजूर पदापैकी ७८ ते ८० पदे ही रिक्त असल्याने कामकाजावर मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागला आहे. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा आवाका लक्षात घेता पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.
पोलिसांना बसण्यासाठी चौक्याच नाहीत
रेल्वे स्थानकात बसण्यासाठी रेल्वे पोलिसांना चौक्याच नाहीत. सध्याचे वसईचे असलेले लोहमार्ग पोलीस ठाणे हे रेल्वे कॉलनीच्या इमारतीमध्ये आहे. मात्र हे देखील कार्यालय वसईच्या रेल्वे स्थानकापासून दूरच्या अंतरावर असल्याने येथे जाण्यास देखील नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होत असतात. वाढत्या गुन्हे व अपघाताचे प्रमाण यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात चौकी असणे आवश्यक आहे. सध्या भाईंदर आणि विरार येथेच चौकी उपलब्ध आहेत, बाकी स्थानकात अजूनही चौक्या नसल्याने एखादी अपघाताची घटना घडल्यास तसेच अपघातामध्ये मृत्यू झालेल्याचे शव स्थानकावर बाहेरच ठेवावे लागत आहे. अशा अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे.