…असं केलं तर ठाकरेच काय, मोदीही तुमच्या दारात येतील; नरेंद्र मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. करोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही’, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला.
उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य न होईलपर्यंत जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी आंदोलन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
“मागण्या पूर्ण न होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, असं आंदोलन करा. तुम्ही असं केलं, तर उद्धव ठाकरेच काय; नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कुणी. आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही”, असं प्रल्हाद मोदी व्यापाऱ्यांना म्हणाले.
करोना आणि लॉकडाउनच्या काळात अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमभंग केल्याप्रकरणात हे गुन्हे दाखल केलेले असून, यासंदर्भातील तक्रारी व्यापाऱ्यांनी मोदी यांच्याकडे मांडल्या. याचबरोबर इतरही मुद्दे त्यांनी प्रल्हाद मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.
नरेंद्र मोदींना चहावाल्याचा मुलगा म्हणा
‘आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात; ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात’, असंही ते म्हणाले.