महिला विशेष : प्रत्येक दिवस सोहळा म्हणून साजरा कर तू तुझ्या स्त्री असण्याचा
मावळ : ‘ती’च्या वाटा काट्या कुट्यातल्या, दगड-धोंड्यातल्या, रक्ताळलेल्या, चिखलातल्या आणि या पार करून पुढे जाताना याच वाटा फुलांनी गंधाळलेल्या, मोहक करणा-या तसेच आयुष्याच्या उंबरठ्यावर उभं राहून निळ्याशार आभाळाकडे स्वच्छंदी आणि स्वयंस्फूर्तीने आव्हाने स्वीकारणाऱ्या…
‘ती’ म्हणजे तीच, जि स्वतःच स्त्रीलिंगी अस्तित्व स्वीकारते. पण म्हणून ती फक्त स्त्री गृहीत धरायची का ? नक्कीच नाही… अशा असंख्य भावना ज्या स्त्रीत्वाला पुरतात आणि पुरून उरतात. तिथेच सुरु होतो ‘ती’ चा प्रवास. मग तिथे ती शरीराने स्त्री असो वा फक्त स्त्रीत्व स्वीकारलेली एखादी भावना असो. म्हणूनच तर इच्छा, शक्ती, उर्जा, स्तुती, भावना, संवेदना, क्षमा हे सर्व जरी शब्द असले तरी ते शब्द स्त्रीवाचक आहेत.
‘ती’ म्हणजे कोण? ती म्हणजे स्वयंभू. ती खरंच कोण आहे हे तिला कोणी सांगू शकत नाही आणि सांगून उपयोग तरी काय… जोपर्यंत ती स्वतःला समजून घेत नाही. स्वतःला ओळखत नाही. ती स्वतःच्याच पायात बेडी अडकवून जगू पाहते. ही पायातील बेडी असते गुलामगिरीची, समाजाने रुजवलेल्या गैरसमजाची, रूढी परंपराची आणि इतरांसाठी डोळ्याआड केलेल्या स्वप्नाची… ही पायातील बेडीच आधार बनून जाते तिचा दुसऱ्यासाठी जगण स्वीकारताना. असंच जगणार आहे का ती ? ती कधीच प्रयत्न करत नाही यातून दूर होऊन स्वाभिमानाने जगण्याचा. उलट तिच्यासारख्या तीला या बेडीची जाणीव करून द्यायला मात्र तयार राहते ती. ही बेडी या आधुनिक समाजात जगताना प्रतिनिधित्व स्वीकारते गांधारीच्या डोळ्यावरील पट्टीच… फरक फक्त एवढाच की ती तिच्या डोळ्यावर असते आणि आपण अदृश्य स्वरुपात तिला पायात मिरवतो. ही बेडी तोडून भिरकावून दे आणि स्वतःच्या नजरेनं बघ. तुला सर्वच समजेल. कुणी का सांगाव तुला तुझ्याबद्दल आणि कोणी सांगितलेलं तरी का उमजावं तुला ? ती तेवढी सुज्ञ नक्कीच आहे म्हणूनच स्वतःला स्वतः समजून घे एकदा आणि स्वत:च अस्तित्व स्वीकारून बघ. सिद्ध तू आपोआप होशील…
‘ती’ म्हणजे संसाररूपी रथातील एक चाक. असं म्हणलं तरी संसारातील एका चाकावर भार जरा जास्तच असतो. स्वतःच करिअर आणि संसार सांभाळताना तारेवरची कसरत तर असतेच . पण त्यातही कर्तृत्व सिद्ध करण्याची जोखीम स्वस्थ बसू देत नाही ‘ती’ ला. मुलांची तसेच आपल्या जोडीदारासह अनेक जबाबदाऱ्या ‘ती’ वरच येऊन थांबतात. आपल्या अपत्याला वाढवताना काही प्रमाणत स्त्री आपल्या नवऱ्याचीही आई होत असते.
पहिलं मूलं होण्यापूर्वी ती फक्त प्रेयसी असते. कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाची किती क्षण ‘ती’ नवऱ्याची ही आई होते. हे कोणत्याही पुरुषाला कळणार नाही. राग, अहंकार अशा स्वरूपातले शत्रू जेव्हा संसारात डोकावतात तेव्हा एखाद्या पेटीतून तलम, मखमली घडीतून एखादी जपून ठेवलेली शाश्वत वस्तू बाहेर काढावी, तशी या राग अहंकारावर भाव खावून जाते ती क्षमा. म्हणून तर दोन जीवांचा संसार सुरु असताना जेव्हा जेव्हा संघर्ष करेल तेव्हा भलेही ती स्त्री असेल पण जेव्हा ती क्षमा करेल तेव्हा ती आईच असते. तेव्हा प्रत्येक पुरुषाला आपल्या संगिनीमध्ये आपली आई दिसते.
तोडून टाक पायातील बेड्या आणि श्वास घे मोकळा. आणि सांग जगाला ‘ती’ आता तयार झालीये. मीच का ? ऐवजी मी का नाही ? हा प्रश्न विचारून बघ एकदा स्वतःला. उत्तर समोर येताना तुझा चेहरा ओसंडून वाहेल आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने. नव्या आव्हानांना स्वीकारताना, तुझ्यातील त्या जीर्ण भावनांना एक नवा साज चढेल. नव्या प्रखरतेने उजळून निघशील तू आणि जगा समोर येईल एक नवी तेजस्विता. सौंदर्य हे तीच सामर्थ्य असतच, पण तीच सामर्थ्य ही तिच्या भाळावर कोंदण घेऊन जगत असते ‘ती’…
आज ८ मार्च महिला दिन या दिवशी काय सांगावं ‘ती’ला. प्रत्येक दिवस उजळून जाऊ दे तुझ्या आनंदाचा. साज चढू दे तुझ्या कर्तृत्वाला. फक्त आजच नाही प्रत्येक दिवस सोहळा म्हणून साजरा कर तू तुझ्या स्त्री असण्याचा. आसमंतात नाद घुमू दे तुझ्या अलौकिक कीर्तीचा…
– सुप्रिया विठ्ठलराव कावरे, तलाठी, मावळ.