चाकण ‘एमआयडीसी’तील ॲमेझॉन कंपनीच्या स्टोअरमधून कामगारांनी सहा मोबाईल लांबविले
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे येथील ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टोअरमधून तीन कामगारांनी सहा मोबाईल आणि एक हेडफोन असा ७७ हजार १९३ रुपयांचा माल लंपास केला. १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी चाकण (महाळुंगे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पंकज बाबुराव धोत्रे (वय ४०, रा. नमोविहार, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अवधूत गारगोटे, आदित्य बालटकर आणि विशाल जाधव (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे येथे ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीतील अवधूत गारगोटे, आदित्य बालटकर आणि विशाल जाधव हे लोडिंग आणि स्टोरेजचे वेंडर असलेल्या कंपनीचे कामगार आहेत. या कामगारांनी ॲमेझॉन कंपनीचा विश्वासघात करून कंपनीमधून चोरी केली. कामगारांनी कंपनीच्या शिपमेंटमधून ७७ हजार १९३ रुपयांचे सहा मोबाईल आणि एक हेडफोन चोरून नेला.
या प्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहेत.