राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये महिलांचा पाणीटंचाईविरोधात ‘हंडा मोर्चा’
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणीटंचाईविरोधात राजगुरूनगरच्या वाफगाव रोड येथील महिलांनी बुधवारी (दि. २६) सकाळी राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये हंडा मोर्चा काढला होता.
अर्चना सांडभोर आणि मिरा कराळे यांच्या नेतृत्वाखाली वाफगाव रोड येथील ओम साई महिला मित्र मंडळाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये ओम साई महिला मित्र मंडळासह परिसरातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
कायदा सुव्यवस्थेचे पालन करत शांततेने हा मोर्चा नगरपरिषद राजगुरुनगर येथे पार पडला. राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकारी लाळगे यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचे आश्वासन दिले आहे.
यावर्षी खेड तालुक्यातील अनेक गावांसह राजगुरुनगर शहरालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पाऊस लांबल्यामुळे अजूनही पाणीप्रश्न “जैसे थे” आहे. लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राजगुरूनगरच्या वाफगाव रोड येथील महिलांनी हे हंडा आंदोलन केले होते.