7-12 तारखेचे औचित्य साधून लाखभर शेतकऱ्यांना मिळणार घरपोच सात-बारा
पुणे – जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना घरपोच मोफत सात-बारा उताऱ्याचे 7-12 तारखेचे (मंगळवारी) औचित्य साधून वाटप करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी नियोजन केले आहे. यामध्ये 557 सजांचे तलाठी यांच्याकडून सात-बारा उताऱ्याचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
महसूल विभागाने 1 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्याना मोफत सुधारित 7/12 वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मोफत वाटप करण्याचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते खळद ता. पुरंदर येथे करण्यात आला होता.
जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या 12 लाख 34 हजार 471 इतकी असून, त्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत अखेरपर्यंत 10 लाख 10 हजार 278 सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 2 लाख 24 हजार 193 सातबारा वाटप करावायाचे आहेत. यापैकी 7 डिसेंबरचे (7-12) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख 7/12 वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.