खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार?
आमदार मोहिते आणि भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटलांचा समझोता; तब्बल 16 वर्षांचा वाद संपुष्टात
खेड – राजकीय एक्झिट घेण्याच्या पवित्र्यात असताना कोणत्याही प्रकारचा वाद ठेवायचा नाही, अशी भूमिका घेत आमदार दिलीप मोहिते पाटील व भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्यात मंगळवारी समझोता झाला. त्यांच्यातील तब्बल 16 वर्षांपासूनचा वाद संपुष्टात आला आहे. दरम्यान, या समझोत्यामुळे खेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप आगामी निवडणुकीत एकत्र येणार का? आणि एकत्र आले तर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांच्यातील तब्बल 16 वर्षांचा वाद मिटला असून, दोघांनी मंगळवारी एकत्र येत न्यायालयातील वाद मिटवण्याबरोबर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही आमदार मोहिते पाटील यांना पुढे जाण्याची संधी निर्माण करून देत शरद बुट्टे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील सोसायटी “अ’ गटातून जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे जिल्हा बॅंक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे बहुमत असतानाही भाजपचे शरद बुट्टे-पाटील या दोघांनी समझोता केला. बुट्टे पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने व या गटातील दुसरे उमेदवार हिरामण सातकर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
दरम्यान, खेड न्यायालयातील खटला तडजोड व जिल्हा बॅंकेचा उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हा बॅंकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली. 2005 मध्ये झालेल्या आरोपावरून आमदार मोहिते यांनी शरद बुट्टे पाटील यांच्या विरोधात येथील खेड न्यायालयात 1 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता.
हा दावा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सुरू होता. हा दावा कोणत्याही अटी, शर्ती शिवाय मोहिते यांनी हा खटला मागे घेतला. तर शरद बुट्टे पाटील यांनी आपला बॅंकेच्या निवडणुकीतून बिनशर्त माघार घेतली.
लक्ष्मण टोपे यांची यशसवी मध्यस्थी
बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण टोपे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. केवळ निवडणुकापुरती आमदार मोहिते व गटनेते बुट्टे यांच्यात तडजोड होण्याबरोबरच सर्व वैयक्तिक मतभेद, कटुता संपवून पुढील वाटचाल सुरू ठेवण्याचा दोघांनी निर्णय घेतला आहे.