महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणूकीत होणार भाजपची सरशी?
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्रात गेले काही वर्षात घडलेल्या अविस्तरणीय अशा सत्तानाट्यामुळे आगामी निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. नुकताच ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने आगामी निवडणूकांच्या निकालाबाबत एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या आगामी निवडणूकीत भाजपची सरशी होणार असे चित्र दिसत आहे.
या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला तब्बल सव्वाशे जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेतून महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला 123-129 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55-56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17-19 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेतुन व्यक्त करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये काहीशी वाढ होत असली तरीही उद्धव ठाकरेंचे कोकणाबाहेरवर्चस्व कमी असल्यामुळे बहुमत मिळणे शक्य नाही असाही अंदाज या सर्व्हेत मांडला आहे.
उर्वरीत जागा इतर पक्षांना मिळतील सांगण्यात आले आहे. आकडेवारी पाहता भाजपला मिळणा-या जागा या आत्तापर्यंतची सर्वोच्च संख्या असेल असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.