गुंतवणुकदार कंपन्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ- उद्योगमंत्री
पुणे । सह्याद्री लाइव्ह। महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप ॲकरमन यांच्यासमवेत आयोजित द्विपक्षीय बैठकीनंतर जर्मन कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत हॉटेल कॉनरॅड येथे आयोजित गोलमेज बैठकीत सामंत बोलत होते. बैठकीस मुंबई येथील जर्मनीचे महावाणिज्य दूत एकिम फॅबिग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, इंडो – जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक स्टेफान हालुसा यांच्यासह जर्मनीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील रोजगारवाढीसाठी परकीय गुंतवणुकदारांचे ‘रेड कार्पेट’द्वारे स्वागत असेल, असे सांगून उद्योगमंत्री सामंत म्हणाले, गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. सध्या पुण्यात असलेल्या जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी तसेच नव्याने येणाऱ्या कंपन्यांना जमीन, पाणी आदी पायाभूत सुविधा, अनुदान, सवलती आदीबाबत सर्व सहकार्य दिले जाईल.
कंपन्यांच्या प्रकल्पांना मंजुरी आणि अन्य अनुषंगिक बाबींसाठी उत्कृष्ट अशी एक खिडकी प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. कंपन्यांनी येथील स्थानिक रोजगार निर्मितीमध्ये मोठा वाटा उचलावा, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली.
कंपन्यांच्या वीजेच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढील १५ दिवसात मंत्रालयातील ऊर्जा विभागाच्या तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये कंपनीनिहाय विजेच्या अडचणींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील. वाहतूक कोंडी, रस्ते यासह स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पोलीस तसेच संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत.
पुणे येथे ३५० जर्मन कंपन्या असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उद्योगमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव येथील ‘लँड बँक’ ची मर्यादा पाहता उद्योगांनी नाशिक, औरंगाबाद- ऑरीक सिटी आदी ठिकाणी देखील गुंतवणुकीचा विचार करावा. या शहरांमध्येही औद्योगिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही सामंत म्हणाले.
महाराष्ट्राकडून अधिकाधिक गुंतवणुकीचे स्वागत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन जर्मनीचे राजदूत डॉ. ॲकरमन म्हणाले, महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीमध्ये जर्मन कंपन्यांचा मोठा वाटा आहे. वाहननिर्मिती, सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांसह अन्य क्षेत्रातील कंपन्यांचीही येथे मोठी गुंतवणूक आहे. यापुढेही जर्मन कंपन्यांकडून राज्यात अधिकाधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी कपंन्यांच्या प्रतिनिधींनी उद्योग विस्ताराच्या दृष्टीने काही सूचना केल्या, त्यावर तात्काळ करावयाच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबत चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.