“आम्ही सगळे पवारांसोबतच”; राज्यातील सत्तासमिकरणाच्या चर्चेवर आमदार दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर सरकार कोसळणार आणि अजित पवार भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार अशा चर्चा, अफवा गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवारांनी आमदार अपात्र झाले तरी सरकार अल्पमतात जाणार नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे. तरिही ही चर्चा संपत नाही.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप माहिते यांना याबद्दल चौकशीपर फोन सतत सुरू आहेत. या सगळ्यावर स्पष्ट प्रतिक्रीया त्यांनी आज दिली. हे सगळं प्रसारमाध्यमांनी तयार केलेलं चित्र असून याबद्दल स्वत: अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे असे दिलीप माहिते यांनी स्पष्ट केले.
आमदार मोहिते म्हणाले, अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे हे सगळ चित्र प्रसार माध्यमांनी उभं केलेलं आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ते त्याबद्दल ठामपणे स्पष्ट बोलतात. या अफवांमुळे लोक आमच्याकडेही संशयीत नजरेने पाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील अशोक पवार, अतुल बेनके, चेतन तुपे, सुनिल शेळके, सुनिल टिंगरे असे आम्ही सगळे राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबतच आहोत असंही ते यावेळी म्हणाले.