शहापूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहापूरसाठीची प्रस्तावित पाणी पुरवठा योजना तपासून तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी शहापूर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, शहापूरचे मुख्याधिकारी, अभियंता आदी उपस्थित होते
पाणी पुरवठा मंत्री.पाटील म्हणाले, शासनाच्या निकषानुसार सर्वांना पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार शहापूर शहरासाठी सादर केलेल्या 135 लिटर्स प्रती दिन प्रती माणसी प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेला तातडीने मान्यता देण्यात यावी.
शहापूर ग्रामपंचायतीसाठी 1983 मध्ये भातसा नदीवर उद्भव घेऊन 40 लिटर प्रती माणसी प्रती दिन प्रमाणे पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. ही योजना जुनी असल्याने वितरण व्यवस्थेचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. सद्यस्थितीत शहापूर नगरपंचायतीची लोकवस्ती वाढत असून वाढीव लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता पुढील 30 वर्षांच्या लोकसंख्येसाठी नवीन पाणी पुरवठा योजना राबविणे प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.