खेड तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा; पंचायत समितीत टँकर मंजुरीसाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव दाखल
खेड । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यात गावांसह वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा बसु लागल्या आहेत. तहानलेल्या गावांचे टँकर सुरु करण्याच्या मागणीचे प्रस्ताव खेड पंचायत समितीत दाखल होऊ लागले आहे. टँकर मंजुरीसाठी आलेल्या १८ गावापैकी १० गावांचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.
यावर्षी उन्हाळा जास्त कडक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच तालुक्याच्या ब-याचशा गावांना पाणी पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. यंदा मान्सुन उशीरा येणार असल्यामुळे पाणीटंचाई ही चिंतेची बाब ठरणार आहे.
पाणीटंचाई निर्माण झालेली गावे, वाड्या वस्त्या आणि लोकसंख्येची आकडेवारी
तालुक्यातील १८ गावसासह ९७ वाड्या वस्त्यांमधील २४ हजार ५८३ लोकसंख्येला टंचाईच्या झळा बसु लागल्या आहेत. वाशेरे गावठाणासह २३ वाड्या वस्त्यामधील २१४६ लोकसंख्येला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने १७ जानेवारीलाच टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला होता. तरी अद्यापही टँकर सुरु झाला नाही.
कोंहिडे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाणासह ९ वाड्यावस्त्यांमधील २४८० लोकसंख्येला टंचाईच्या झळा बसत असुन ९ मार्च रोजी प्रस्ताव दाखल झाला आहे. कोंहिडे परीसरातील तळवडे ग्रामपंचायतीने टँकर सुरु करण्याबाबत प्रस्ताव ९ मार्चला दाखल केला होता. गावठाण आणि ठाकरवाडी मिळुन ८३७ लोकसंख्येला टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गारगोटवाडी गावठाणासह ५ वाड्या मिळून १२२२ लोकसंख्येला टंचाई निर्माण होऊ लागली असुन १८ एप्रिलला टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव दाखल झाला आहे. चासकमान धरणातंर्गत कोयाळी तर्फे वाडा गावच्या डोगंरावरील सुपेवाडीतील ३०० नागरीकांना टंचाईला सामोरे जावे लागत असुन टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव १३ मार्चला दाखल झाला आहे. वेताळे येथील डोगंरावरील ६८२ लोकवस्तीला टंचाई निर्माण झाली असुन १८ एप्रिलला प्रस्ताव दाखल झाला.
साबुर्डी गावठाणासह चार वाड्यांना टँकर सुरु करण्यासाठी २४ मार्चला प्रस्ताव दाखल झाला असुन ८२५ लोकसंख्येला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वडगाव पाटोळे येथील ३०१ लोकसंख्येच्या ठाकरवाडी टंचाईला सामोरे जावे लागत असुन १० एप्रिल ला प्रस्ताव दाखल झाला आहे. दोंदे गावच्या चार वाड्यांच्या ९२० लोकसंख्येला पाणी टंचाईच्या झळा बसु लागल्या असुन २८ एप्रिलला प्रस्ताव दाखल झाला आहे.
डेहणे परीसरातील नायफड गावठाणासह ८ वाड्यावस्त्यांमिळुन १६४१ लोकसंख्येला पाणी टंचाईच्या झळा बसत असुन २३ मार्चला टँकर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव दाखल झाला आहे. वाडा गावच्या डोगंरद-यातील ९३० लोकसंख्या मिळुन ४ वाड्याना पाणी टंचाईला सामोरै जावे लागत आहे. १३ मार्चला प्रस्ताव दाखल झाले आहेत. वाळद गावच्या डोंगरातील ३०१ लोकसंख्येच्या तळपेवाडीला टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव १० एप्रिल रोजी दाखल झाला आहे. आव्हाट गावच्या डोंगरद-यातील ७ वाड्यांमिळुन १४०० लोकसंख्येला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन १८ एप्रिलला प्रस्ताव दाखल झाला आहे.
जऊळुके बु. येथे गावठाणासह १२ वाड्यावस्त्यांमिळुन १६२२ लोकसंख्येला टंचाईच्या झळा बसत असुन १० एप्रिलला प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. वाफगाव गावठाणासह ६ वाड्यामिळून ३००२ लोकसंख्येला पाणी टंचाईच्या झळा बसत असुन १० एप्रिलला प्रस्ताव दाखल झाला आहे. वरुडे गावठाणासह१२ वाड्यावस्त्यांमिळुन ३२१० लोकसंख्येला झळा बसत असुन १० एप्रिल ला प्रस्ताव दाखल झाला आहे.
चिंचबाईवाडी येथील गावठाणासह ६ वाड्यावस्त्यांमधील १३०० लोकसंख्येला २४ एप्रिल पासुन टंचाईच्या झळा बसत असुन प्रस्ताव दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे वाफगाव, वरुडे, चिंचबाईवाडी आदि परीसरातील गावांना जलयुक्त शिवार योजनेसह नदी ओढा खोलीकरणाची कामे करण्यात येऊन कोट्यावधी रुपयांचा चुराडा करुनही ही गावे आजही तहानलेलीच पहावयास मिळत आहे.
प्रशासनाचा कानाडोळा की स्थानिक ग्रामस्थांची मिलीभगत?
पुर्व पट्यातील गुळाणी येथे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावालगत पाझरतलाव असताना प्रशासनाचा कानाडोळा की स्थानिक ग्रामस्थांची मिलीभगत हा प्रश्न कायमच समोर येतो. या तलावालगत शेतीला बेसुमार पाणी उपस्यामुळे आणि मुठभर शेतक-यांच्या आडमुठी धोरणामुळे संपूर्ण गावाला टँकर मागण्याची नामुष्की येताना दिसत आहे. गुळाणी गावठाणासह चार वस्त्यांमिळुन १५५० लोकसंख्येला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांनीही २३ मार्चला प्रस्ताव दाखल केला आहे.
खेड पंचायत समितीत पाणी टंचाई बाबत टँकर सुरु करण्याचे प्रस्ताव दाखल झाले असुन वाशेरे, कोंहिडे बु. तळवडे, साबुर्डी, कोयाळी तर्फे वाडा, जऊळुके बु., गुळाणी, वाफगाव, चिंचबाईवाडी, वरुडे अशा दहा गावातील पाणीटंचाईबाबत महसुल विभागाकडे संयुक्त तपासणीसाठी सादर केल्यानंतर महसुल आणि पंचायत समिती मिळुन प्रत्यक्षात भेटी देऊन तपासणी करण्यात आली. टँकर मंजुरीसाठी १८ गावापैकी १० गावांचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.