जल…जीवन.. बांबू.. लातूरचा नवा पॅटर्न…!!
लातूर : लातूर जिल्ह्यातील वृक्ष अच्छादन राज्यात सर्वाधिक कमी असून ते एक टक्यापेक्षाही कमी आहे. ते वाढविण्यासाठी आता आता बांबू सारख्या जल व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या,उत्तम आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आणि आपल्याला जगण्यासाठी ज्या ऑक्सिजनची आवश्यकता असते ते ऑक्सिजन सर्वाधिक देणाऱ्या वृक्षात बांबूचा गणना होत असल्याने बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी. ही लोकचळवळ व्हावी आणि लातूरचा नवा बांबू पॅटर्न तयार व्हावा त्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज दिली.
पोकरा योजनेअंतर्गत आज मांजरा नदीच्या काठावर असलेल्या सलगरा गावी 100 एकरवर बांबू लागवड शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आ. पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उप विभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, सलगरा गावच्या सरपंच शांताबाई साळुंखे, शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नद्यांचे पुनःरुजीवन
लातूर जिल्ह्यातील प्रमुख मांजरा नदी आणि इतर उपनद्या बारामाही वाहत्या ठेवायच्या असतील तर पाण्याचे मोठ्या प्रमाणात संवर्धन करणाऱ्या बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. मांजरा नदीच्या काठावर असलेल्या जिल्ह्यातील शंभर गावात वृक्ष लागवडीचे नियोजन असून बांबू सारखे पर्यावरणाला अत्यंत पोषक आणि शेतकऱ्यांना पैसे देणारे हे वृक्ष लावावे.
पोखरा, मनरेगा सारख्या योजनेतून प्रशासन मदत करेल पण त्यासाठी गावांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले. बांबू लावलात तर त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगातही गुतवणूक होऊ शकते. सलगरा गावाने आज 100 एकर मध्ये बांबू लावून फक्त जिल्ह्यालाच नाही तर राज्याला नवा आदर्श घालून दिला आहे. भविष्यात सलगऱ्याच्या या पॅटर्नवर लोक “केस स्टडीज ” करतील एवढं मोठं काम इथे उभं राहिल असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले.
शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा विकास असे दुहेरी फायदा असणारे वृक्ष म्हणजे बांबू आहे. भुजल प्रदूषण संपविण्यासाठीही बांबू महत्वाची भूमिका बजावेल. यासाठी पोकरा सारखी योजना शेतकऱ्यांना बांबू लावण्यासाठी मोठा हातभार ठरणार असून जिल्हा परिषदही याकामी मदत करेल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव गोयल यांनी दिली.
जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष अच्छादन करण्यासाठी पोकरा योजना ही अतिशय उत्तम असून पोकरा योजनेच्या निधीसाठी मर्यादा नाही. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केले.
झाडं कार्बन खातात आणि प्राणवायु ऑक्सिजन आपल्याला देतात. बांबू सारखे झाड इतर वृक्षापेक्षा अधिक ऑक्सिजन तर देतच पण एक किलो दगडी कोळशातून जेवढी ऊर्जा मिळते तेवढीच ऊर्जा एक किलो बांबू जाळल्यावर मिळते त्यामुळे इथून पुढे 10 टक्के बांबू औष्णिक विद्युत केंद्रासाठी वापरला जाणार आहे. इथेनॉलसाठीही मोठ्या प्रमाणात बांबू वापरला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदाही होणार असल्याची माहिती माजी आ. पाशा पटेल यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कलईत बसून पार केली मांजरा
मांजरा नदीच्या ऐलतीरी सलगरा येथे बांबूच्या वृक्षाची लागवड करून आणि पैलतीरी तोंडोळी शिवारात जाण्यासाठी मांजरा नदीत कलई टाकून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवास केला.. तोंडोळी ( ता. औसा ) गावातील मांजरा नदीच्या काठी जवळपास पन्नास एकरावर बांबू लागवड होणार असून तिथेही जिल्हाधिकारी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते बांबू रोपण झाले.
जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर नदीकाठी बांबू लागवड करणारे सलगरा गाव हे जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार असून इतर गाव या गावचा आदर्श घेणार असल्यामुळे सर्वांनी गावाकऱ्यांचे कौतुक केले आहे.