विसापूर आणि लोहगड किल्ल्यांना संभाजीराजे छत्रपती यांची भेट
अंगणात बसून घेतला रम्य जेवणाचा आस्वाद
मावळ : मावळातील प्रसिद्ध विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांना सोमवारी (दि. 3) कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. दगडी वाटेतून मार्ग काढत त्यांनी प्रथम विसापूर किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गडपायथ्याला आल्यावर अंगणातील रम्य झाडीत बसून घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर किल्ले विसापूरलाच लागून असलेल्या लोहगडची संभाजीराजे यांनी पाहणी केली.
आपल्या या भेटीचा अनुभव आणि छायाचित्र संभाजीराजे यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. युवराज संभाजीराजे यांनी विसापूर, लोहगड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हटले की, “आज किल्ले विसापूर व लोहगड किल्ल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान आपुलकीने आमचे आदरातिथ्य केले ते बोरडे कुटुंबीयांनी चांगली व्यवस्था केली होती.अत्यंत आपुलकीने केलेले अस्सल गावरान पद्धतीच्या जेवणाने मन अगदी तृप्त झाले.
फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन चळवळ राबवताना गडकोटांच्या जतन संवर्धनाबरोबरच गड परिसरातील जनतेला स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान उंचावले जावे, यासाठी माझे प्रयत्न राहतील तसेच गडकोटांच्या घेऱ्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्धता व इतिहास प्रेमी, दुर्गप्रेमींची व पर्यटकांना मुलभूत सुविधा हा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी फोर्ड फेडरेशनच्या वतीने निश्चितच प्रयत्न केले जातील, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती संभाजी राजे यांचा जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, शिवभक्त विजय तिकोणे, लोहगड विकास मंचाचे विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन बोऱ्हाडे, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी यांच्यासह लोहगड ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी त्यांच्या समवेत सह्याद्री प्रतिष्ठान, लोहगड विसापूर विकास मंच, रेन्बो सर्विससचे सदस्य उपस्थित होते.