कमानमधील माझा मताधिकार या देखाव्याला जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची भेट
चासकमान । सह्याद्री लाइव्ह । तालुका खेड येथील बारापाटी शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी घरगुती गणेश मूर्ती समोर शंभर टक्के मतदान करा व लोकशाही वाचवा या अभियानांतर्गत मतदारांमध्ये मतदान विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझा मताधिकार’ या विषयावर आधारित देखावा सादर केला आहे.
श्रीगणेशोत्सवातील देखाव्याला जवाहर नवोदय विद्यालय पुणे च्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि यावेळी नव्याने मतदार होत असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना देखील प्रत्येकाचे मतदान कार्ड ओळखपत्र काढून आवर्जून मतदान करण्याबाबत नाईकरे दाम्पत्याकडून मार्गदर्शन करण्यात आले व जनजागृती करण्यात आली.
यावेळी आलेले सर्व विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेले विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थी असून उद्याचे भावी इंजिनियर, डॉक्टर व उदयोन्मुख प्रशासकीय अधिकारी याकरिता परीक्षा दिलेले हे परीक्षार्थी होते. त्यांनी आजच्या सदिच्छा भेटीदरम्यान श्री क्षेत्र भीमाशंकर येथील सह्याद्री पर्वतरांगांवर गिरी भ्रमण केले त्यानंतर भोरगड व भोरगिरी परिसरातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या. हे परीक्षार्थी लवकरच प्रशासनाच्या विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रातील अधिकारी वर्गाच्या जागां करिता ही परीक्षा देणार असून त्यांना भावी जीवनात आदर्श व जबाबदार नागरिकत्वाबाबत तसेच प्रत्येक वेळी अवश्य मतदान करण्याबाबत जागरूक करण्यात आले.
यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना जीवनातील विविध समस्यांना यशस्वीपणे सामोरे जाताना उपयोगी पडेल अशा उपयुक्त पुस्तकांची भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
‘संघर्ष यशाोगाथा’ या पुस्तकांतील व्यक्तिमत्त्वांचा जीवन संघर्ष व त्यातून त्यांनी संपादन केलेले यश याला कष्टाची एक वेगळीच किनार लाभलेली आहे हे जीवनानुभव या नवोदित विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटेवर वाटचाल करताना निश्चितच उपयोगी पडतील. म्हणूनच पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तूपेक्षा मिळालेले हे पुस्तक आयुष्यभराचा ठेवा म्हणून आम्ही जतन करू, अशी प्रतिक्रिया वेदांत नाचण (भिगवण) या विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
यावेळी अनिकेत शेलार श्रीगोंदा, सुयोग शिंदे इंदापूर, भागवत गव्हाणे आळंदी देवाची, प्रतिक केंद्रे आंबेगाव, जयदीप चव्हाण (नाशिक) तसेच सदिच्छा नाईकरे, विश्वराज नाईकरे, संजय नाईकरे व वैशाली नाईकरे तसेच पंडितराव नाईकरे गुरुजी हे नाईकरे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.