वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : पीडित व संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर हे महत्त्वाचे केंद्र असून खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित सर्व मदत मिळण्यास सोईचे होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
पीडित व संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी कविता राठोड, श्याम मोदेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,पीडित महिलांसाठी एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने महिलांना भटकंती करावी लागणार नाही. महिलांशी निगडीत सर्व तक्रारींचे निवारण एकाच केंद्रातून केले जाणार आहे.
पीडित व संकटग्रस्त महिला तसेच मुलींसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली तात्पुरत्या निवासाची सोय, आरोग्यविषयक, कायदेविषयक, मानसशास्त्रीय, समुपदेशन, वैद्यकीय,संकटकाळात प्रतिसाद आणि संकटमुक्तीची सेवा यासारख्या सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यभरात सुरू आहे. संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.