ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज निधन
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। साठ वर्षांहून जास्त काळ आपल्या गायनाने श्रोत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज निधन झाले असुन वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या आवाजाने सुलोचना बाईंनी श्रोत्यांची मने तृप्त केली. शेकडो गाणी आजही त्याच्या आवाजाने अजरामर झाली आहेत. गायनासोबतच सामाजिक कामातही सुलोचना चव्हाण अग्रेसर होत्या.
एकेकाळी दागिने विकून त्यांनी पुणेकरांची मदत केली आहे. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी आदी भाषांमध्येही पार्श्वगायन केले. ज्याकाळी लावणीला फारशी प्रतिष्ठा नव्हती, तेव्हाही त्या अत्यंत सन्मानाने लावणी गात होत्या. त्यांच्यासारखा आवाज आता पुन्हा होणे नाही. त्यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान तसेच त्यांनी अनेक सामाजिक कामेही केलेली आहेत.
१९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटले, त्यावेळी पुण्यावर मोठे संकट ओढवले असल्याने लोकांच्या जीविताचा, मूलभूत गरजांचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी पुण्यातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून सुलोचना बाईंनी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. परंतु या कार्यक्रमातून पुरेसा मदतनिधी जमा झाला नाही. म्हणुन त्यांनी स्वत:चे दागिने विकून मदत केली. अशा या थोर गायिका सुलोचना चव्हाण ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली .