मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान राज्यात ‘बाल सप्ताह’ साजरा करणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.
आयोगाच्या अध्यक्ष शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वरळीतील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबईत हा सप्ताह राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव उदय जाधव, मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, युनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी सायली मोहिते आदी उपस्थित होते.
बाल सप्ताहाविषयी माहिती देतांना शहा म्हणाल्या की, बाल दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी ‘बाल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. बालकांसाठी ‘राईट टु प्ले’ (खेळण्याचा अधिकार) हा या सप्ताहाची संकल्पना (थीम) असणार आहे. हा सप्ताह युनिसेफच्या सहकार्याने आयोजित केला जाणार आहे. राज्यातील बालकांच्या विशेषत: बालगृह आणि सीसीएफच्या मुलांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या बालकांमध्ये खेळाबाबत प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांना संधी देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘बाल सप्ताह’ कार्यक्रम राबवून मुलांसाठी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेशहा यांनी सांगितले.
बाल सप्ताहाच्या माध्यमातून मुलांना चांगली संधी मिळेल. राज्यातील मुलांसाठी एकत्र मिळून बालस्नेही महाराष्ट्र घडवू या, असे आवाहनही आयोगाच्या अध्यक्षा शहा यांनी यावेळी केले.