‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’च्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैष्णव ठाकूरला सुवर्णपदक
राजगुरुनगर : बंगलोर येथे २४ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील वैष्णव ठाकूर याने वेटलिफ्टिंग या खेळाच्या ९६ किलो वजनी गटात १३५ किलो स्नॅच व १७८ किलो क्लिन अॅण्ड जर्क असे एकूण ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली.या यशाबद्दल वैष्णव ठाकूरचा विशेष सत्काराचा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.
यावेळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, गोपनीय विभागाचे संदीप भापकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रा. एस. एन. टाकळकर, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी वैष्णव ठाकूरचे अभिनंदन करताना त्याच्या कामगिरीबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली. वैष्णवने विद्यापीठाचे नाव उंचावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थाचालक म्हणून आम्ही सर्व राष्ट्रीय खेळाडूंच्या पाठीशी सर्वार्थाने उभे आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वैष्णव ठाकूरला क्रीडा संचालक प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. तानाजी पिंगळे, प्रा. सारिका गोरे, प्रा. योगेश मोहिते यांनी मार्गदर्शन आणि राहुल गायकवाड यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले. प्रा. प्रतिमा लोणारी यांनी आभार मानले.