इपिलेप्सी आजाराबाबत जनजागृती करण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आवाहन
पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हा रुग्णलयातील मदत कक्षाचे झाले उद्घाटन
नाशिक : इपिलेप्सी आजारावर वेळेत औषध उपचार केल्यास तो बरा होतो. म्हणून नागरिकांनी इपिलेप्सी (मिरगी) या आजाराबाबत अंधश्रद्धेला बळी न पडता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज आयोजित शिबीरात केले आहे.
आज जिल्हा शासकीय रूग्णालय येथील ईपिलेप्सी आजार निदान व उपचार आयोजित शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत ते होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुंटुबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास, सहसंचालक डॉ. पट्टण शेट्टी, इपिलेप्सी फाउंडेशनचे डॉ. निर्मल सुर्या, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, न्यूरो फिजिशियन डॉ. आनंद दिवाण, यांच्यासह जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी परिचारीका व इपिलिप्सी फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणले की, कोरोना काळात डॉक्टरांनी नारिकांना आरोग्यसेवा देवून देवदूतासारखे काम केले आहे. हा आजार बरा होत असल्याने नारिकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून वेळेत उपचार घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी इपिलेप्सी रुग्णांना कुठल्याही परिस्थितीत औषधे कमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
इपिलेप्सी फाउंडेशनच्या वतीने डॉ.निर्मल सुर्या यांच्या माध्यमातून राज्यात 95 शिबीरे घेण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 10 शिबीरे घेऊन जिल्हा रुग्णालय व इपिलिप्सी फाउंडेशनच्या वतीने या शिबीरांच्या माध्यमातून 350 रुग्णांना मार्गदर्शन करून रूग्णांना औषध उपलब्ध करून दिली त्यासाठी मी इपिलेप्सी फाउंडेशनचे आभार मानतो. तसेच जिल्हा रुग्णालय येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या स्थानीक भाषेत माहिती मिळावी यासाठी मदत कक्ष उभारण्यात आले असून या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी विविध कक्षांची पहाणीही केली.
इपिलेप्सी आजाराबाबत शहरी व ग्रामीण भागात करावी जनजागृती – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
इपिलेप्सी हा ग्रामीण भागातील दुर्लक्षित आजार आहे. या आजाराबाबत शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात. तसेच या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने जनजागृती करण्यासाठी अशा सेविकांचीही मदत घ्यावी, अशा सुचना केंद्रीय आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.
यावेळी बोलतांना केंद्रीय आरोग्य व कुंटुबकल्याण राज्यमंत्री डॉ.पवार म्हणाल्या की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे घेण्यात येत आहे. या शिबीरांच्या माध्यमातून या रुग्णांना मोफत औषधे व उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याने नारिकांनी त्याचा फायदा घ्यावा. तसेच इपिलेप्सी फाउंडेशनचा हा जिल्ह्यातील पायलेट प्रोजेक्ट असल्याने त्यांनी भविष्यातही असेच मार्गदर्शन करावे, अशी आशाही ,केंद्रीय आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री डॉ पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.