केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवास भेट
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. दरवर्षी विविध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या या मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याचे केंद्रीय मंत्री शाह यांनी कौतुक केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार ॲड. आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे २७ वे वर्ष असून, या मंडळामार्फत दरवर्षी एका प्रसिद्ध मंदिराची आरास केली जाते. मागील वर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते. तर, मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गणेशोत्सव मंडळामार्फत धार्मिक उत्सवाबरोबरच अनेक वैद्यकीय तसेच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येत असून आरोग्याबाबतचे आवश्यक ते सर्व नियमही पाळले जात असल्याची माहिती, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली.