पर्यटन क्षेत्रातच बेरोजगारीची वाणवा
- सिंहगड, घेरा परिसरातील अनेक कुटुंबे बेरोजगारीच्या कोंडीत
खडकवासला – सिंहगड आणि परिसरातील मंदिरांना ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि निसर्गाची मुक्त उधळण यामुळे येथील पर्यटनाला मोठा वाव आहे. तरीही या परिसरात रोजगाराची वाणवा कायम दिसून येत आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा अनेक मंत्री, खासदार आमदारांनी या ठिकाणी भेटी देवून विकासाच्या दृष्टीने परिसराची पाहणी केली. अनेक आश्वासने दिली गेली परंतु पर्यटन विकास मात्र थंडच आहे.
सिंहगड, राजगड, तोरणा, शिवनेरी, लोहगड, पुरंदर, तिकोणा, तुंग, रोहिडेश्वर आदी गड किल्ले सध्या सुरू झाले आहेत. करोना काळात राज्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला होता. आता पर्यटनासह सर्व व्यवसाय रूळावर आला आहे. त्यामुळे बेरोजगार तरूणांच्या नजरा सरकारच्या पर्यटन विकासाकडे लागल्या आहेत. सिंहगड-खडकवासला परिसराला देखील गडकोट बंदीचा मोठा फटका बसला असून, गेल्या सात महिन्यांपासून सिंहगड व घेरा परिसरातील अनेक कुटुंबे बेरोजगारीच्या आर्थिक कोंडीत सापडली आहेत.
लगतच्याच खडकवासला- पानशेतच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या ३० ते ३२ गावांतील स्थानिक व्यवसायिकांनाही देखील याची झळ सोसावी लागत आहे. गडावरील हॉटेल चालक, दही-ताक विक्रेते व खासगी प्रवासी वाहन चालक आणि मालक असे जवळपास साडेचारशेच्यावर व्यावसायिक तर पुरते हतबल झाले आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेले स्थानिक आदिवासी गडकरी आज नोकरी व रोजंदारीचे शोधात असताना त्यांचे पदरी निराशा पडत आहे.
पर्यटकांची पहिली पसंती सिंहगड येथे पावसाळी हवामान व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. परंतु पर्यटन विकासाअभावी येथील बहुसंख्य नागरिकांपुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने सिंहगड, पानशेत, खडकवासला हे पर्यटन शहर म्हणून विकसित करावे. औद्यगिक विकासाला चालना द्यावी. यामुळे रोजगार निर्मिती होऊन परिसरातील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करण्याबाबत प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
विकासात्मक धोरणांची गरज
खडकवासला धरण भागात नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, सुरळीत वाहतूक व पार्किंगची व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण यासाठी सरकारने कृती कार्यक्रम आखला पाहिजे. सिंहगड परिसरातील पानशेत रस्त्याचे काम रखडले आहे. ते लवकर पुर्ण करावे. प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यास नियोजन करणे गरजेचे आहे.
…तरच बेरोजगारी संपुष्टात येईल
पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी सगळया प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात. पानशेतमधील रस्ते अरुंद आहेत. येथील रस्ते प्रशस्त हवेत. परिसर अतिक्रमणमुक्त असायला पाहिजे. भाविकांच्या सोयीसाठी उत्तम वाहनतळ, स्वच्छतागृहांची उपलब्धता, चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था करण्याची गरज आहे. तरच बेरोजगारी संपुष्टात येईल.