राजगुरुनगरकरांना अल्टिमेटम; मालमत्ता कर भरा, अन्यथा घरापुढे वाजंत्री लावणार
राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेची थकित पाणीपट्टी व मालमत्ता कर नगरपरिषदेच्या कार्यालयात त्वरित भरावा, अन्यथा संबंधित व्यक्तींच्या घरापुढे वाजंत्री लावण्यासह त्यांची नावे पेपरमध्ये प्रसिद्ध केली जातील. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत पाणीपट्टी मालमत्ता कर नगरपरिषदेत येऊन भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांनी केले आहे.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या मालमत्ता कर व पाणी पट्टी अनेकांनी भरली नसल्याने पाणी व विजेचे बिल भरण्यासाठी अडचणी येत आहेत. नगर परिषदेचा 2 कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे तर पाणी पट्टी 80 लाख रुपये थकीत आहेत. एप्रिल 2021 ते डिसेंबर 21 अखेर केवळ 23 टक्के वसुली झाली असल्याने नगर परिषदेची आर्थिक स्थिती कमजोर होत चालली आहे. पाण्याच्या मोटारीचे, स्ट्रीट लाईट आदिचे वीजबिल भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मुख्याधिकारी घारगे म्हणाल्या की, नगरपरिषदेची सुमारे तीन कोटी मालमत्ता कर, पाणी पट्टी थकीत असल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना अनेकदा आवाहन करूनही मालमत्ता कर घरपट्टी भरली जात नाही. म्हणून थकीत करवसूल करण्यासाठी घरापुढे वाजंत्री लावून पेपरमध्ये नावे प्रसिद्ध करण्याबरोबरच न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी थकीत कर भरावेत व कारवाई टाळावी. राजगुरूनगर शहरासाठीची नवीन पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे. टेंडर होऊनही केवळ एक्प्रेस फिडर नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. शहरातील रस्ते कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील.