उद्धव ठाकरेंचं मातोश्रीबाहेर ओपनकारमध्ये भाषण
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । शिवसेना हे नाव आणि धनुष्यबानाचे चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाचा निषेध आणि शिंदे गटावर टीकांचा मारा केला जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये मातोश्रीबाहेर ओपन कारमध्ये उभे राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.
‘धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील.. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते असं थेट आव्हान देत धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो असे ठाकरे म्हणाले. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उताणा पडला. या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही.
मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.