शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक सुविधा पुरविणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
नागपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. मिहान पुनर्वसन परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभाकक्षामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील विविध विषयाबाबतची आढावा बैठक सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. पी. बोरकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे, उच्च व शिक्षण सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, अधिष्ठाता डॉ. नितीन घवघवे, डॉ. सुनील पुसदकर तसेच संबंधित विभाग प्रमुख, अध्यापक यावेळी उपस्थित होते.
शासकीयमहाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येतील , असे सांगून सामंत म्हणाले की , तंत्रनिकेतन येथील अतिथी अध्यापकांच्या वाढीव मानधनाचा निर्णयाबाबत लवकरच शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. तसेच त्यांची प्रलंबित देयके जून महिन्याच्या अखेरपर्यंत अदा करण्यात येतील. आवश्यकतेनुसार कंत्राटी तत्त्वावर अतिथी अध्यापकांची नियुक्ती करण्याबाबत सामंत यांनी सकारात्मकता दर्शविली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा मार्ग लवकरच मोकळा करण्यात येईल. यासंदर्भात निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पुढील महिन्यात मुंबई येथे आढावा बैठक घेण्यात येईल. त्याचप्रमाणे प्राचार्य, सहसंचालक यांचे वित्तीय अधिकार वाढविण्याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांची मागणी असलेले अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर दयावा ,असेही सामंत यावेळी म्हणाले.
सामंत यांनी यावेळी प्राध्यापक तसेच विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वसतिगृहाची क्षमता वाढवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.सामंत यांनी यावेळी येथील सफाई कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.सामंत यांच्या हस्ते यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य बोरकर यांनी यावेळी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनच्या कामकाजाबाबत सामंत यांनी समाधान व्यक्त केले.