कंपनीच्या दोन संचालकांचा जामीन फेटाळला
पुणे – गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 कोटी 8 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात मिनान्स टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीच्या दोन संचालकांचा जामीन विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी फेटाळला. दोघेही कर्नाटकात राहत असून, मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.
सरबाशिस पराशर बासू (वय 28) आणि अधिराज अमित सिंग (वय 27) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. वानवडी येथील राजेश मोटवाणी (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. सप्टेंबर 2017 ते 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. कंपनीच्या सीईओवरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. फिर्यादींना सोशल नेटवर्किंग साईटवरून या कंपनीची माहिती मिळाली. त्यातील विविध योजना फिर्यादींना आवडल्या. त्यानुसार कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयाला भेट देण्यात आली. तिघांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन गुंतविण्यास भाग पाडले.
जुलै 2019 पर्यंत नफा देण्यात आले. त्यानंतर पैसे न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. यास विशेष सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी विरोध केला. कंपनीच्या सीईओला अद्याप अटक करण्यात आली नाही. गुन्हातील फसवणूकीची रक्कम कोठे आहे, याबाबत ते सांगत नाहीत. त्यांच्यावर मुंबई येथेही गुन्हा दाखल आहे. जामीन दिल्यास ते फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. वाडेकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.चे नियोजन करण्यात आले आहे.