बारामती तालुक्यात उसाला आला तुरा
उत्पादन घटणार : ज्वारीची पीक जोमदार
बारामती – बारामती तालुक्यात प्रतिकूल हवामान, अवकाळीची दमदार हजेरी आदी कारणांमुळे गाळपास जाणाऱ्या उसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची वर्षभराची पुंजी असलेल्या रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. त्यामुळे उत्पादनवाढीची आस शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या हवामान बदलाचा परिणाम बारामती तालुक्यातील ऊस पिकावर झाला आहे. खराब हवामानामुळे व वातावरणातील बदलाने उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे उत्पादन घटत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेत वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गाळपासाठी साखर कारखान्यात ऊस लवकर जावा यासाठी प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहे. दुसरीकडे बारामती तालुक्यात यावर्षी पाण्याची मुबलकता असल्याने ज्वारीची पिके जोमदार आली आहेत.
पिके जोमदार आल्याने ज्वारीचे उत्पादनात देखील वाढ होणार आहे. सध्या ज्वारी हुरड्यात आली असून ठीकठिकाणी शेतांमध्ये हुरडा पार्ट्या देखील काही दिवसांत सुरू होणार आहेत. त्यामुळे ज्वारी पिकांमुळे शेतकरी समाधानी होणार आहे.