राजगुरुनगर पाणी योजनेच्या क्रेडीटसाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहराला शुद्ध पाणी मिळावे यासाठी राजगुरुनगर नगरपरिषदेने पाणी योजना मंजूर केली होती. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मते कोणताही अडथळा न आल्यास या योजनेचं काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल. गेले काही महिने राजगुरुनगरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते.
ही योजना पूर्णत:कडे जात असतानाच राजकीय रंगबाजी सुरू झाली आहे. ही योजना लवकरच पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसू लागताच. या योजनेचं क्रेडिट घेण्यासाठी राजकीय पक्ष सरसावल्याचं दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे खेड-आळंदी मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या निष्क्रियतेमुळे हे काम लांबलं, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
ही योजना लांबण्यासाठी पूर्णपणे आमदार दिलीप मोहीते यांना जबाबदार धरत अतुल देशमुख यांनी मोहितेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. तर या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार दिलीप मोहिते यांनी या कामात भ्रष्टाचार कोणी केला, ‘मलिदा कोणी खाल्ला?’ असा सवाल अतुल देशमुख यांना केला.
यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्याच्या अनेक गावांसोबत राजगुरुनगर शहरालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पाऊस लांबल्यामुळे हा प्रश्न अजूनही सामान्य नागरिकांना सतावत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये आणि राजगुरुनगर शहरातही काही भागात अजूनही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. राजगुरुनगरला शुद्ध पाणी कधी मिळणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
एकीकडे पाऊस लांबल्यामूळे तालुक्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आणि दुसरीकडे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करणारे राजकीय नेतेमंडळी कामाचे क्रेडीट घेण्यासाठी रस्सीखेच करत एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत.