अवघ्या सात मिनिटांत राजगुरुनगरमध्ये ‘तस्कर’ जेरबंद
खेड । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहराजवळील करंडे वस्ती येथील बालाजी फेज नंबर दोन येथे विश्वराज नाईकरे याच्या तत्परतेने एका तस्कर जातीच्या सर्पाला पकडण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजगुरुनगर करंडे वस्ती येथे शनिवारी (दि. १९) सायंकाळी पोखरकर यांच्या घरी साप दिसला. पोखरकर कुटूंबातील सदस्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
‘साप म्हणजे साक्षात मृत्यू’ असे चुकीचे समज समाजात पसरलेले आहेत. या विषयात स्वतःहून जनजागृती करणारा कमान येथील बाल सर्पमित्र विश्वराज नाईकरे या विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचली. विश्वराज याने भ्रमणध्वनीवर सर्पमित्रांशी संपर्क साधला. परगावी गेलेले सर्पमित्र समूहातील सदस्य संजय नाईकरे यांनी राजगुरुनगरमधील सर्पमित्रांशी संपर्क साधून पोखरकर यांच्या घरी पाठविले.
राजगुरुनगर येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य आणि सर्पमित्र समूहातील सदस्य ज्येष्ठ सर्पमित्र देवराम शिंदे यांना पोखरकर यांच्या घरातील स्थितीची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांत देवराम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अवघ्या काही मिनिटांत पूर्ण वाढ झालेल्या तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला सुरक्षितरित्या पकडून रेस्क्यू करत जीवदान दिले. साप बिनविषारी असला तरी केवळ त्याची नेमकी ओळख नसल्याने लोक घाबरतात.
तत्परतेमुळे विश्वराज नाईकरे याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. राजगुरुनगर शहर आणि परिसरातील नागरिकांनीही अशीच जागरूकता दाखवित आपल्या परिसरातील कोणत्याही प्रकारचे साप आढळून आले, तर त्यांना न मारता जवळच्या सर्पमित्रांना कळवावे, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य व लाईफ जागतिक पर्यावरण संस्थेचे समन्वयक संजय नाईकरे यांनी केले आहे.
1 Comment
Very nice… खूप तत्पर आणि समाजोपयोगी वार्तांकन…. खूप खूप धन्यवाद