पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
पुणे । सह्याद्री लाइव्ह। जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत यात्रा व्यवस्थापक (टूर ऑपरेटर्स), हॉटेल असोशिएशन, टूरिस्ट गाईड्स यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोढा म्हणाले, पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यासारखे गडकिल्ले, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटक क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध कार्यरत असणाऱ्या संघटनेची मदत घेऊन समिती स्थापन करावी.
पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शासनाचा मानस आहे. यादृष्टीने या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल. समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्यादृष्टीने नवनवीन कल्पना सूचविण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक करमरकर यांनी दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.