गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन
आळंदी : करोना महामारीमुळे गेली दोन वर्षे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या स्पर्श दर्शनापासून वारकरी, भाविक दुरावले. मात्र गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात येत्या शनिवारी (दि. २ एप्रिल) माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन भाविकांना मिळणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवाच्या दिवशी (दि. २ एप्रिल रोजी) सकाळी सहा वाजल्यापासून श्री ज्ञानोबारायांचे संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन करण्याचा निर्णय श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला आहे.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन दिले जाणार असले तरी करोना महामारीचे संकट अद्यापही टळलेले नाही, त्यामुळे माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन हे वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता, लहान बालकांनी संस्थान कमिटीने सुरू केलेल्या ऑनलाइन दर्शन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.
संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी हे करा…
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालूनच वावरावे, शक्यतो मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही संस्थानकडून करण्यात आले आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी असे असतील मंदिरातील कार्यक्रम
पहाटे ३.३० वाजता : घंटानाद
पहाटे ३.३० ते ३.४५ : काकडा आरती
पहाटे ४.०० ते ५.३० : पवमानपूजा, दुधारती, गुढीपूजा
पहाटे ५.३० ते दुपारी १२.०० भाविकांना ‘श्रीं’च्या चलपादुकांवर अभिषेक/महापूजा
सकाळी ६.०० ते सकाळी ७.०० : पंचाग पूजन
सकाळी ७.०० ते सकाळी ८.०० : प्रवचन – साधकाश्रम, आळंदी
दुपारी १२.०० ते १२.३० : ‘श्रीं’ना महानैवद्य
दुपारी १२.३० ते दुपारी २.०० : भाविकांना ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन
दुपारी २.०० ते सायंकाळी ६.०० : ‘श्रीं’ना चंदनउटीद्वारे श्री गणेश अवतार, भाविकांना संजीवन समाधीचे दर्शन बंद राहिल.
दुपारी : २.०० ते सायंकाळी ६.०० : भाविकांना ‘श्रीं’च्या चलपादुकांचे दर्शन (कारंजा मंडप)
सायंकाळी ४.०० ते ६.०० : कीर्तन – वै. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था – वीणामंडप
रात्री ८.०० ते ८.३० : ‘श्रीं’ची धुपारती
रात्री ८.३० ते ११.३० भाविकांना ‘श्रीं’च्या गणेश अवताराचे मुखदर्शन – पंखामंडप
रात्री ११.३० ते १२.०० : ‘श्रीं’ची शेजआरती (त्यानंतर मंदिर बंद)