आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत
मुंबई | सह्याद्री लाइव्ह। आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते. यावेळी या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, देवराव होळी, सुलभा खोडके, आशिष जयस्वाल, राजेंद्र शिंगणे यांनी भाग घेतला.
आरोग्यमंत्री प्रा. सावंत म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी पट्ट्यामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेवून या भागातील बालविवाह रोखणे, यासह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील. तसेच गर्भवती स्त्रियांसाठी तीन वर्षाचा कार्यक्रम राबवावा यासाठी सर्वांची मते विचारात घेऊन योजना राबविण्यात येणार आहे. लसीकरण, पदभरती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदेदेखील पूर्ण क्षमतेने भरण्यात येतील.
महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी महिला व बालविकास विभाग आदिवासी विकास विभागाच्या समन्वयाने विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.