पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
चंद्रपूरमध्ये अंगाची लाहीलाही; ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुणे : उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, गोवा, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरमध्ये अंगाची लाहीलाही झाली, तर ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात हवामान कोरडे होते. पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी तर कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झालेली दिसते. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास पोहोचले.
शुक्रवारपासून २५ एप्रिलपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस कोसळेल. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात शुक्रवारी (दि. २२) सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. २४ आणि २५ एप्रिल रोजी विदर्भात हवामान कोरडे राहिल, मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज दिसते. याउलट २४ आणि २५ एप्रिल रोजी कोकण-गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल, अशी स्थिती निर्माण झाल्याची सद्यस्थिती आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविलेले कमाल आणि किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) :
मुंबई (कुलाबा) ३२.५, सांताक्रुझ (३४.८), अलिबाग (३२.३), रत्नागिरी ( ३४.८), पणजी (गोवा) (३५.८), डहाणू (३४.४), पुणे (३९.६), अहमदनगर (३९.६), जळगाव (४३.४), कोल्हापूर (३८.७), महाबळेश्वर (३२.५), मालेगाव (४३.०), नाशिक (३७.०), सांगली (४०.२), सातारा (३९.१), सोलापूर (४३.०), औरंगाबाद (४१.६), परभणी (४३.०), नांदेड (४२.२), अकोला (४४.९), अमरावती (४४.२), ब्रम्हपुरी (४५.३), चंद्रपूर (४५.२), गोंदिया (४४.०), नागपूर (४३.२), वाशीम (४३.५), वर्धा (४४.२).
दोन दिवस पुणे परिसरात अंशत: ढगाळ; पावसाचीही शक्यता
पुणे, पिंपरी-चिंचवडसह उपनगरांमध्ये पुढचे दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. याशिवाय पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या उपनगरांसह पिंपरी-चिंचवड शहरातील पुढील दोन दिवस अशी स्थिती कायम राहिल, असेही हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.