सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदकधारकांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. सैन्य दलातील एअर कमोडोर देवेंद्र पुरुषोत्तम हिराणी, मेजर अनुज वीर सिंह आणि मेजर अक्षय प्रकाशराव पोतराजे यांना राज्य शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई उपनगर येथील एअर कमोडोर देवेंद्र पुरुषोत्तम हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शौर्यासाठी युद्ध सेवापदक प्रदान करण्यात आले आहे.
त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे हिराणी यांना 24 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2015 विशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले होते. त्याकरिता हिराणी यांना रूपये 34 हजार अनुदान देण्यात येणार आहेत.
मुंबई उपनगर येथील मेजर अनुज वीर सिंह यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यासाठी सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार सिंह यांना 12 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली येथील मेजर अक्षय प्रकाशराव पोतराजे यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार पोतराजे यांना 6 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.