राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य दीपस्तंभासारखे – पालकामंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , गुणी माणसांची पारख केली. आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य दीपस्तंभासारखे आहे असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त, खासबाग मैदान येथे महा – ताल या वाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राजस्थान येथील मामे खान रॉक्स अॅण्ड रूट्स तसेच पंडित राकेश चौरासिया अॅण्ड फ्रेंडचे सदस्य , विजय देवणे, आदिल फरास , चित्रनगरीचे संचालक संजय पाटील ,सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक बीभीषण चवरे आदी उपस्थित होते .
पालकमंत्री पाटील म्हणाले, खासबाग मैदान उभारुन त्यांनी कोल्हापुराला कुस्ती पंढरीचा मान मिळवून दिला. नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या या अलौकिक कार्यामुळे अनेक दिग्गज येथे घडले. कोल्हापूर येथे व्यापार वाढावा यासाठी शाहुपूरी बाजारपेठेची स्थापना करण्याबरोबरच जयसिंगपूर ही व्यापारपेठ निर्माण केली. यामुळे कोल्हापूरचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. असे सांगून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आज 6 मे रोजी सकाळी 10 वाजता लोकराजाला कृतज्ञता अर्पण करण्यासाठी कोल्हापूरवासियांनी 100 सेकंद स्तब्धता पाळावी, असे आवाहनही केले.
यावेळी राजस्थानी गायक मामे खान यांच्या चमूने पारंपारिक राजस्थानी लोकगीते तसेच चित्रपट गीते तर प्रख्यात बासरीवादक हरीप्रसाद चौरासिया यांचे पुतणे पंडीत .राकेश चौरासिया व त्यांच्या राकेश अॅण्ड फ्रेण्ड ग्रुपने सुरेल बासरीवादन केले. खासबाग मैदान येथे ७ मे पर्यंत चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवाचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
दिव्यांनी उजळले राजर्षी शाहू समाधी स्थळ
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कॅन्डल मार्चला प्रारंभ
लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी पूर्वसंध्येला दसरा चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर कॅन्डल मार्च काढण्यात येऊन समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतीला अनोख्या उपक्रमातून अभिवादन करण्यात आले. कॅन्डल मार्च शाहू समाधीस्थळावर पोहचल्यावर समाधी स्थळावर उपस्थितांनी पणत्या प्रज्वलित केल्या. या दिव्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे समाधी स्थळ उजळून गेले.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून कॅन्डल मार्चचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मधुरीमाराजे छत्रपती, यशराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कॅन्डल मार्च शाहू समाधीस्थळी पोहोचल्यानंतर समाधीस्थळावर पणत्या प्रज्वलित करून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या जय घोषाने संपुर्ण परिसर दणाणून गेला.कॅन्डल मार्चमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मान्यवर पदाधिकारी आणि शाहु प्रेमी नागरिक उपस्थित होते.कॅन्डल मार्च कार्यक्रमाचे संयोजन कृती समिती सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य डॉ. महादेव नरके, आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, प्राचार्य अजय दळवी, अमरजा निंबाळकर,जयदीप मोरे, सुखदेव गिरी यांनी केले.