कडधे, आखारवाडी, वेताळे गावातील महावितरणच्या विद्युत रोहित्रांमधील कॉइल, ऑईलवर चोरट्यांचा डल्ला
शेतकरी, ग्रामस्थांचे हाल; शेतीपंप बंद असल्यामुळे पिकांना पाणी देणे लांबणीवर
खेड । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडधे, वेताळे आणि आखारवाडी या गावांतील महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रांमधील शेकडो लीटर ऑइल आणि तांब्याच्या कॉइल चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये ५०५ लीटर ऑइल आणि ५० किलो तांब्याची कॉइल असा तीन गावांतील विद्युत रोहित्रांमधून ५१ हजार पाचशे रुपयांचे ऑइलसह साहित्य लंपास केले आहे.
कडधे आणि आखारवाडी रोहित्रातून आईल आणि कॉइल चोरीप्रकरणी चास शाखेच्या कनिष्ठ अभियंता स्वाती प्रदीप पाटील (वय ३२, रा. राजगुरुनगर) यांनी फिर्याद दिली आहे. स्वाती पाटील यांच्या फिर्यादीवरून कडधे येथील बाह्यस्त्रोत ११/६३ केव्ही आणि आखारवाडी येथील ११/६३ केव्ही रोहित्रांमधील ऑईल आणि तांब्याची कॉइल चोरट्यांनी लांबविली.
महावितरणच्या कडूस शाखेंतर्गत वेताळे गावातील महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने खोलून त्यामधील ऑईल चोरी केली. या प्रकरणी सहायक अभियंता राहुल मच्छिंद्र पालखे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
वेताळे येथील रोहित्रातून ३५० लीटर ऑइल चोरून नेले. तर आखारवाडी आणि कडधे येथील रोहित्रातून ३३ हजार पाचशे रुपयांचे ऑईल आणि कॉइलची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष घोलप तपास करीत आहेत.