खेड पंचायत समिती आवारातून माती, मुरूम, पेव्हर ब्लॉकची चोरी
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या आवारातील पेव्हर ब्लॉक उखडून त्याचा निघालेला मातीचा मलबा पंचायत समितीच्या समोरील आवारात टाकण्यात आला असताना रविवारी (दि. 2) रात्री 9 वाजता ट्रॅंक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने अज्ञात व्यक्तींनी उचलून नेला. संबंधित व्यक्तीवर व त्याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खेड पंचायत समोरील जागेत काही वर्षांपूर्वी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. त्याजागेत कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने ते काढून पंचायत समितीच्या पुढील मोकळ्या जागेत सुरक्षित ठेवण्यात आले होते; मात्र रविवारी (दि. 2) अज्ञात व्यक्तीने जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते गुपचूप चोरून नेले आहेत.
याबाबत शहरातील नागरिकांनी गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे या चोरीबाबत माहिती दिली; मात्र त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खेड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळी माती, मुरूम व पेव्हर ब्लॉक अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.
कारवाई करणार
सभापती अरुण चौधरी यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगत घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी, पत्रकार उपस्थित होते. चक्क सरकारच्या जागेतील मातीचा शेकडो ब्रास चोरी होऊन पंचायत समितीचा बांधकाम विभाग मौन पाळून होता. माती उचलणारा कोण? याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करुन यामागे कोणत्या अधिकारी आणि पदाधिकारी यांचा सहभाग आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व माती पेव्हर ब्लॉक उचलून नेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सभापती अरुण चौधरी यांनी सांगितले.