राष्ट्रीय संगीत अकादमीचे कार्य उल्लेखनीय – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। संगीत नाटक क्षेत्राच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय अकादमीच्या माध्यमातून सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. डॉ. संध्या पुरेचा येणाऱ्या काळात राष्ट्रीय संगीत अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला या क्षेत्राची ओढ लावण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी बांबू निर्मित तिरंगा भेट देऊन डॉ संध्या पुरेचा यांचा सांस्कृतिक मंत्री यांनी सत्कार केला.
संगीत नाटक क्षेत्रातील प्रतिष्ठित मानले जाणारे 3 विविध गटांतील 17 पुरस्कार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राने पटकावले ही बाब गौरवास्पद असून राज्यात संगीत नाटकास प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासन कलावंतांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास मुनगंटीवार यांनी डॉ संध्या पुरेचा यांच्याशी बोलताना व्यक्त केला. यावेळी अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ विद्याधर व्यास, डॉ. उमा डोगरा, डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.