दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । संपूर्ण देशासाठी मानबिंदू असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित बैठकीत दिले.
नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, समीर मेघे, विकास कुंभारे, मोहन मते, आशीष जयस्वाल, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर आदी लोकप्रतिनिधी तसेच माजी मंत्री सुलेखा कुंभारे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे सचिव, नागपूरच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा वाढीव खर्च पाहता तो तत्काळ प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावा, या स्मारकाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. या स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. ड्रॅगन पॅलेस टेंपलला सुद्धा आवश्यक निधी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी 22 कोटी, शांतिवनसाठी 7.76 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. याही कामाला गती देण्यात यावी. 118 कोटी रुपये खर्च करून संत चोखामेळा वसतिगृहाचे काम करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून हे वसतीगृह 13 मजली करुन 1000 विद्यार्थी क्षमतेचे ते असावे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीत विविध कामांचे सादरीकरण करण्यात आले. काही प्रस्तावांच्या बाबतीत निधीची मागणी करण्यात आली तर काही बाबतीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्य खरेदी, अग्निशमन केंद्र, मनपा टाऊन हॉल, बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन, देवडिया हॉस्पिटल, नंदग्राम प्रकल्प, नरसाळा-हुडकेश्वर मुलभूत सुविधा कामे तसेच मलवाहिका व्यवस्थापन इत्यादी कामांसाठी 1506 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय/विभागीय आयुक्त आणि तहसिल कार्यालय यांचे ऐतिहासिक वारसा जतन करुन नवीन उभारावयाच्या कार्यालयाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हा प्रकल्प तत्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.