विवाहसोहळ्याला पर्यावरण संवर्धनाची झालर
बारामतीत रंगला आगळावेगळा सोहळा : नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून उपक्रम
बारामती : आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे आपण पाहिले. मात्र, आज बारामतीत एक अनोखा विवाहसोहळा बारामतीकरांनी अनुभवला. बारामतीच्या इतिहासात प्रथमच शून्य कचरा लग्नसोहळा पार पडला. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी सचिन खोरे यांनी आपल्या विवाहसोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा उत्सर्जित होणार नाही, याची काळजी घेत एक वेगळा आदर्श घालून दिला. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खोरे यांनी स्वतःच्या लग्नसोहळ्यात एक वेगळा पायंडा पाडला.
लग्नात केवळ शून्य कचरा उत्सर्जित होण्यास प्रतिबंध केला नाही तर लग्नसोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेची शपथही दिली. प्लॅस्टिकचा वापर तसेच कागदी ग्लास किंवा प्लेटचाही वापर केला नाही. प्लॅस्टिकविरहीत असा हा विवाहसोहळा पार पडला. एकीकडे मंगलाष्टके व दुसरीकडे स्वच्छतेची शपथ देत सचिन खोरे यांनी आपला विवाह खऱ्या अर्थाने आगळावेगळा केला.
नगरपालिकेच्या वतीने महेश रोकडे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून स्वच्छतेबाबत विशेष उपाययोजना सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर लग्नाच्या माध्यमातूनही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. महेश रोकडे यांच्यासह आरोग्य सभापती सूरज सातव यांच्या हस्ते स्वच्छतादूत प्रमाणपत्र आणि देशी वृक्ष भेट देत सचिन खोरे व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
या पुढील काळात सर्वच मंगल कार्यालयांमधील प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याबाबत संबंधितांना विनंती करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक निर्मूलन हा स्वच्छता मोहिमेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. कचरा विलगीकरणासोबतच प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.
– महेश रोकडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, बारामती.