महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची खेड तालुकास्तरीय बैठक मार्केट कमिटी सभागृहात झाली
राजगुरुनगर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची खेड तालुकास्तरीय बैठक मार्केट कमिटी सभागृहात झाली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ज्याप्रमाणे बांधकाम विभागाकडे नकाशानुसार रस्त्यांच्या नोंदी असतात, त्याचप्रमाणे विद्युत लाइनचे नकाशे तयार करावेत असे निर्देश दिले. तसेच नादुरुस्त असलेले डीपी बॉक्स तत्काळ बदलण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, पुणे जिल्हा विद्युत वितरण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड, तालुका समितीचे सदस्य उमेश गाडे, जगन्नाथ राक्षे, दत्तात्रय गोरे, इजाज तांबोळी यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे साहेब, उपकार्यकारी अभियंता गारगोटे व तळपे, सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, खेड तालुक्यात एकूण संख्या ३८ ठिकाणी नवीन रोहित्र उभारणी सुरु आहे. तसेच ६५ ठिकाणावरील कामे प्रगतीपथावर असून २२ रोहित्रांची क्षमता वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. कृषी योजनेमधून रोहित्रांचे प्रस्ताव ५१, उच्च दाब वाहिनी व लघुदाब वाहिनीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच मोई, रोहकल, निघोजे, आंबेठाण, राजगुरुनगर, गोलेगाव, दवणेमळा अशी एकूण ४२ लक्ष रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. कृषी योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील १८४३ शेतकऱ्यांना नवीन कृषिजोड योजनेअंतर्गत कनेक्शन देण्यात आले. २२ केव्हीचे निघोजे व म्हाळुंगे येथे उपकेंद्रे ८.५६ कोटी रुपये खर्च करून उभारणी करण्यात आली.
प्रस्तावित कामे
चिखलगाव व साबुर्डी येथे ५ एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्रांसाठी ६.३५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ३३ केव्ही १० व ५ क्षमतेचे वाकी, कुडे बुद्रुक, चिंचोशी, पिंपरी खुर्द, साबुर्डी, डेहेणे येथे उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कडूस येथे ५ एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्रे १.३५ कोटी रुपयांचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. पानमंदवाडी येथे सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला.