‘गावं तसं चांगलं पणं…’ : शंभर वर्षांची बिनविरोध परंपरा खंडित; खेड तालुक्यातील ‘या’ गावच्या निवडणुकीत तीन पॅनलमध्ये झाली कडवी झूंज
दोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; श्री भीमाशंकर पॅनलला अवघ्या दोन जागा
खेड । सह्याद्री लाइव्ह : सत्ताधा-यांसाठी मोठं आव्हान उभे केलेल्या दोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १० पैकी आठ जागा जिंकून राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत श्री भीमाशंकर पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे गावातील काही मंडळींनी निवडणुकीत एकत्र येत उभे केलेल्या उमेदवारांनी आव्हान उभे केले असले तरी त्यांना विजय खेचून आणता आला नाही. विशेष म्हणजे दोंदे सोसायटीने २०२१ मध्ये शताब्दी महोत्सव वर्षे थाटामाटात साजरे केले खरे पण गेली शंभर वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा ‘या’ निवडणुकीने खंडित केली.
सोसायटीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने आठ जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. तर श्री भीमाशंकर पॅनलने दोन जागा जिंकत प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान उभे केले. दुसरीकडे निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हाच्या पॅनलच्या उमेदवार विजयापासून दूर राहिले.
दोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव २०२१ मध्ये मोठ्या थाटात साजरा झाला. गेली शंभर वर्षे सोसायटी निवडणुका बिनविरोध होत असताना सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत मात्र तीन पॅनलमध्ये लढत होऊन नवमतदार उमेदवारांनी ज्येष्ठ शेतकरी सभासद उमेदवारांना आव्हान दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दोंदे सोसायटीच्या १३ जागांपैकी इतर मागास प्रवर्गातून आनंदराव राघुजी मेहत्रे आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून शाम ठाकर हे दोघे जण ‘कपबशी’ समर्थक पॅनलमधून बिनविरोध निवडून आले. उर्वरित १० जागांसाठी ४४६ मतदारांपैकी ४०४ मतदान झाले.
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातील आठ जागांसाठी १४ उमेदवार रिगंणात होते. या गटात ४०३ मतदानापैकी २७ मते बाद झाली, तर २७६ मते वैध ठरली.
निवडणुक केंद्राध्यक्ष भरत हुलावळे, रमेश पाचारणे, राम नाणेकर, अर्जन भोकसे, गणेश निकम, निचिकेत प-हाड, सचिव बाळासाहेब बबन बारणे यांनी कामकाज पाहिले.
दाेंदे सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवार
ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर कदम, जितेंद्र कोहिणकर, महादू बनकर, प्रकाश सुकाळे, दत्तात्रय शितोळे, शंकर उढाणे, धोंडीभाऊ भालसिंगे, संध्या बारणे, कविता सुकाळे हे दहा उमेदवार निवडून आले. तर आनंदराव मेहत्रे, शाम ठाकर हे दोघे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत लादे यांनी जाहीर केले.
मातब्बरांना नवमतदारांच्या पॅनलकडून टक्कर
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते मारुती आप्पा बारणे, सदाशिवराव कोहिणकर यांच्या ‘कपबशी’ चिन्हावरील शेतकरी सहकार विकास पॅनलपुढे शिवकुमार सुकाळे, अमोल सुपेकर आणि नितीन सुकाळे यांच्या श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलने ‘घड्याळ’ चिन्हावर पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांनी ‘कपबशी’ चांगलीच गरम केली. या निवडणुकीत श्री भिमाशंकर शेतकरी सहकारी विकास पॅनलच्या तीन उमेदवारांनी स्वतंत्र पॅनल करुन चांगली लढत दिली. विमानाने हवेत घिरट्या घालत विजयाचे गणित बिघडून टाकत ‘कपबशी’ला विमानाने कमालीची टक्कर दिली. या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांपर्यंत आपल्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी चागंलीच तारेवरची कसरत करावी लागली.
उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे
शंकर विठ्ठल उढाणे (२१३), ज्ञानेश्वर नागेश कदम (२९६), सुखदेव एकनाथ करंडे (८७), ज्ञानेश्वर बजरंग काळे (३०९), जितेंद्र सूर्यकांत कोहिणकर (२८५), महादू तुकाराम बनकर (२५४), हरिभाऊ गेनभाऊ बारणे (१२७), धोंडीभाऊ रामभाऊ भालसिंगे (२१०), पांडुरंग तुकाराम भालसिंगे (७४), दत्तात्रय धोडींबा शितोळे (२२०), दामू शंकर सुकाळे (१४०), प्रकाश दत्तात्रय सुकाळे (२५४), रमेश धर्मा सुकाळे (१३७), शिवाजी रामभक्त सुकाळे (१३७).
महिला गटातील दोन जागांसाठी झालेल्या चौरंगी लढतीत ४०३ मतदानापैकी २२ मते बाद झाली. तर ३७९ मते वैध ठरली. मीना सोपानराव उढाणे (१२७), संध्या दतात्रय बारणे (२५८), कविता मच्छिंद्र सुकाळे (२४८), सुनंदा मोहन सुपेकर (९४).