बैल बाजारातील उलाढाल वाढणार
चाकण परिसरात बैलगाडा चालक-मालकांनी असा जल्लोष केला.
चाकण- बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळण्याचे वृत्त या भागात येऊन धडकताच बैलगाडा चालक, येलवाडी. काळूस, पिंपळगावसह ठिकठिकाणी गुरूवार अक्षरशः जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे या निर्णयाने बैल बाजारातील उलाढाल वाढणार आहे हे नक्की.
गावाकडच्या यात्रा-जत्रांमध्ये सर्वाधिक आकर्षण असणार्या बैलगाडा शर्यतींवर लादण्यात आलेली बंदी न्यायालयाने सशर्त उठविण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा गावाकडच्या यात्रांमध्ये ’भिरर्र…. झाली उचल की टाक..’ हा नेहमीचा घाटातील सूर कानी पडणार आहे. चाकण, येलवाडी, काळूस, पिंपळगावसह ठिकठिकाणी भंडार्याची उधळण आणि वाद्य वृंदाच्या गजरात बैलांच्या मिरवणुका काढून जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर चाकण येथील गुरांच्या बाजारात बैलांच्या आवकेवर व किमतीवर परिणाम झाला होता. बैलगाडा शर्यत बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्याने चाकणमधील बैल बाजारात कमी झालेले बैलांच्या खरेदी –विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत. शर्यत बंदीमुळे शर्यतीच्या मागील काही वर्षांत उठाव नसल्याची स्थिती होती. बंदी उठल्याने खास शर्यतीच्या बैलांना येथे मागणी वाढणार आहे. गावोगावच्या यात्रांची उत्कंठा पुन्हा वाढणार असून बैलगाडा बनविणार्या मंडळींचा रोजगारही पुन्हा सुरू होणार आहे.