विदर्भात सूर्य तळपला; उत्तर भारतासह राज्यात उष्णतेची लाट
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तर गोंदियात किमान तापमानाची नोंद; पुढील तीन दिवस मराठवाडा, विदर्भात लाहीलाही होणार
पुणे : राज्यात उष्णतेने बुधवारी (दि. ३०) ‘कमाली’चे भाजून काढले. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झाली. पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्र आणि गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर गोंदिया जिल्ह्यात १९.५ किमान तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे विदर्भातील पा-याने ‘चाळीशी’ ओलांडली. तसेच पुढील तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट जाणवेल, असा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे.
उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रात धडकली असून, राज्यातील १६ हून अधिक जिल्ह्यांचा पारा चाळीशी अंशांवर गेला असून, बहुतेक जिल्हे ‘चाळीशी’च्या उंबरठ्यावर आहेत. अंगाची लाहीलाही करणा-या या उष्णतेचा कहर २ एप्रिलपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ व मराठवाड्यात ब-याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लढणीय वाढ झाली आहे.
राज्यात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, तापमानात सरासरीपेक्षा ४.२ अंशांची वाढ झाल्याने सर्वदूर उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा उष्णतेची धग कायम असणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र २ एप्रिलपर्यंत ‘येला अलर्ट’ राहीन, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
विदर्भ व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे दिसते. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्याच्या बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तुरळक वाढ झाली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुण्याचे तापमान ३९.५ अंशावर
पुण्यातील तापमानाने बुधवारी चाळीशी गाठली असली तरी गुरुवार आणि शुक्रवारी तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे व परिसरातील नागरिकांनी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. पुणे, पाषण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे, पुढील दोन दिवस उष्णतेत आणखी वाढ होईल, असेही निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.