आरोग्य यंत्रणेने जबाबदारीने काम केल्यानेच कोरोना साथीला थोपविण्यास यश – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
कोल्हापूर: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने अतिशय जबाबदारीने काम केल्यामुळेच राज्यात कोरोनाच्या साथीला थोपविण्यास यश आले, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने कोविड साथीमध्ये आणि विविध आरोग्य कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या आरोग्य संस्था, अधिकारी, आशा स्वयंसेविका तसेच शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी, शिक्षण सभापती रसिका पाटील, आरोग्य सभापती वंदना जाधव, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
.पाटील-यड्रावकर म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना साथीमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास प्राधान्य देण्यात आले. साथीच्या काळात आरोग्य विषयक समस्या उद्भवू नयेत म्हणून निर्बंध लावण्यात आले होते. याबरोबरच कोरोना काळात जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिला. या साऱ्यामुळेच कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेला थोपविण्यास यशस्वी झालो आहोत. यापुढेही गाव, तालुका, जिल्हा, राज्य कोरोना मुक्त ठेवण्यास शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य संपन्न जीवनासाठी ग्रामीण भागात आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात येत असून यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी नवीन संकल्पना राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून जिल्हा परिषदेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यास पुढे यावे, असेही आरोग्य राज्यमंत्री यावेळी म्हणाले.
आमदार . आसगावकर म्हणाले, चांगले काम करणाऱ्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्यास पुढील काम करण्यास नवी उर्मी मिळते. जिल्हा परिषदेने कोविड काळात उत्कृष्ट काम केलेल्याचा सत्कार करुन आपले उत्तरदायित्व पार पाडल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनास धन्यवाद दिले.