उरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- पालकमंत्री कु. आदिती तटकरे
अलिबाग : महाविकास आघाडीचे हे शासन राज्याचा विविध प्रकारे विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच, त्याप्रमाणेच उरण तालुक्याच्या विकासासाठीही हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या युवक व क्रीडा राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज उरण तालुक्यातील करंजा येथे केले.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या सामाजिक कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत संस्थेतर्फे दि.2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन.एम.एस.ई झेड (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर, बोकडविरा, तालुका उरण येथे जिल्हास्तरीय 21 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी करोनाविषयक सर्व प्रतिबंधक नियम व अटींचे पालन करीत प्रशांत पाटील, भावना घाणेकर, भार्गव पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, डॉ. मनीष पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी द्रोणागिरी महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजकांनी केलेल्या काटेकोर नियोजनाचे कौतुक केले व त्या पुढे म्हणाल्या की, उरणच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे शासन कटीबद्ध असून उरण तालुक्यात सुसज्ज असे शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी तसेच सर्व सोयीसुविधायुक्त असे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी अवश्य प्रयत्न केले जातील. त्यासाठी सिडको, जे. एन. पी. टी व संबंधित प्रशासनासोबत बैठक घेऊन, नियमित पाठपुरावा करून या सुविधा लवकरात लवकर पुरविल्या जातील. या क्रीडा महोत्सवातील स्पर्धांमध्ये विविध देशी-विदेशी 132 हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम द्रोणागिरी देवी (करंजा )येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले व नंतर क्रीडा ज्योतीचे क्रीडा संकुलात आगमन झाले, त्यानंतर ध्वजारोहण होऊन क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी द्रोणागिरी युवा महोत्सवाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली आणि उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना खेळण्यासाठी सुसज्ज असे हक्काचे मैदान उपलब्ध करून देण्याविषयी पालकमंत्री आदिती तटकरे यांना विनंती केली.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रियांका भोईर -न्यू पनवेल (कला,क्रीडा,शैक्षणिक), हार्दिका पाटील -पेण रावे (शैक्षणिक ), चेतन पाटील -खोपटे (कला ), भाग्यश्री घरत -सावरखार जोडी (कला ), पुष्पलता ठाकूर -नेरे पनवेल (सामाजिक ), रिद्धी म्हात्रे -रंजणखार -अलिबाग (शैक्षणिक ), आराध्य पाटील -पागोटे (गिर्यारोहक ), समीर म्हात्रे-कळंबूसरे (शैक्षणिक) , भूषण तांबे-पनवेल (साहित्य ), सुहास नाईक-टाकीगाव ( शैक्षणिक ), मानसी कोळी -पनवेल (क्रीडा ), संतोष म्हात्रे -गोवठणे शैक्षणिक ), संगीता ढेरे -उरण (सामाजिक ), गिरीश कुडव -उरण( शैक्षणिक ), श्रवण बने -उरण (शैक्षणिक ), उदय माणकावले -पेण (सामाजिक ),अश्विनी धोत्रे -उरण (सामाजिक ), या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते द्रोणागिरी भूषण पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले.
तसेच एल.बी.पाटील (साहित्यिक ), पुंडलिक म्हात्रे (साहित्यिक ), डॉ वीर (वैद्यकीय ),सामीया बुबेरे (सामाजिक ), संस्कार म्हात्रे, डॉ सत्या ठाकरे, अधिकार पाटील, प्रतीत पाटील, डॉ.प्रशांत बोंद्रे, दिगंबर कोळी आणि सहकारी, जागृती ठाकूर, संतोष ठाकूर, अमेया घरत, चाईल्ड केअर सामाजिक संस्था,उरण या व्यक्ती व संस्थांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.