राज्यात आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता
पुणे । सह्याद्री लाइव्ह । राज्यातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी वाढले आहे. दिवसा निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उन्हाच्या चटक्यातही वाढ झाली आहे. पुढील सुमारे आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहून, राज्यात काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानात घट होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार डिसेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी असणार आहे. उत्तरेकडील राज्यांत सध्या थंडीचे प्रमाण कमी आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती सुरू झाली आहे. या भागातून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार होत आहे. परिणामी महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे.
६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि दक्षिणेकडील इतर काही भागांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ स्थिती राहील. परिणामी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.