रेडवडी गावच्या जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा
कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
रेटवडी । सह्याद्री लाइव्ह । रेडवडी येथील जलजीवन मिशनच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. परिसरात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्रधिकरण यांच्या अंतर्गत जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च केला जात आहे. परंतू कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होते आहे. रेटवडी गावच्या सरपंच माया थिटे आणि ग्रामपंचायत सदस्य किरण पवार यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खेड तालुक्यातील रेटवडी येथे १५ कोटी रूपयांचे जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. त्यामध्ये पाण्याची टाकी, नवीन जलवाहिनी, विहीर, आदी कामांना मंजूरी मिळाली आहे.
हे काम सुरू असताना ठेकेदाराने गावातील सिमेंटचे रस्ते फोडले परंतू पुन्हा पूर्ववत केले नाहीत. काम सुरू असताना शेतक-यांच्या जलवाहिनी फुटल्या पण त्या पुन्हा जोडून दिल्या नसल्यामुळे शेतक-यांची मोठी गैरसोय होत आहे. जलवाहिनीच्या खोदाकामासाठी वृक्षतोड केली जात आहे.
याबाबत अनेक तक्रारी करूनही अधिका-यांनी त्याची दखल घेतली नसल्रूाचा आरोप ग्रातस्थ करत आहे. कोणाचाही धाक नसल्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्याचबरोबर नागरिक, शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची चौकशी व्हावी, अन्यथा काम बंद पाडून आंदोलन करण्याचा इशारा गावक-यांनी दिला आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES