श्री खंडोबा मंदीरातून चोरीला गेलेला ऐवज मंदिर विश्वस्थांकडे सुपुर्त
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदीरातून तेरा वर्षांपुर्वी चोरीला गेलेली चांदी आणि सोने मंदिर विश्वस्थांकडे सुपुर्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर खेड पोलीसांनी शुक्रवारी (दि. ४) ही कार्यवाही केली आहे.
खेड पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते पाच किलो चांदी आणि सव्वा तोळे सोने असा जवळपास १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा ऐवज शुक्रवारी (दि. ४) श्री खंडोबा मंदिराच्या विश्वस्थांकडे देण्यात आले.
यावेळी खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह संतोष गोरे, सागर शिंगाडे त्याचबरोबर मंदिराचे विश्वस्थ आणि निमगाव गावचे ग्रामस्थ बापुसाहेब भगत, योगेश गुरव, मोहन भगत, दिलीप भगत, हरून पठान, वैभव गुरव, बाळासाहेब भगत उपस्थित होते.
तेरा वर्षांपुर्वी २०१० च्या मे महिन्यात खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिरामध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवासमोरच्या पिंडीवरील पाच किलो चांदीचे आवरण आणि सव्वा तोळे सोन्याचा घोडा लांबविला होता. २०१२ मध्ये पोलीसांनी चारपैकी दोन चोरांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरी केलेला सगळा ऐवज जप्त केला होता.
या सगळया प्रकरणावर न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. नुकतेच या प्रकरणात चोरीला गेलेला ऐवज फिर्यादी म्हणजेच मंदिर विश्वस्थांकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर खेड पोलीसांनी हा ऐवज श्री क्षेत्र निमगाव गावचे ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्थांकडे सुपुर्त केला.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES